

सिरोचा :- अहेरी–कमलापूर मार्गावर 15 दिवसांत दुसऱ्यांदा बसचे चाक निखळले; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
अहेरी : अहेरी–कमलापूर मार्गावर गुरुवारी, 3 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 11 वाजता अहेरी आगाराच्या एसटी बसचे चाक अचानक निखळून बाहेर आल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, धावत्या बसचे चाक निखळल्याने मोठा अपघात थोडक्यात टळला.
विशेष म्हणजे, 13 ऑगस्ट रोजी मेळारामजवळ अहेरी आगाराच्या एसटी बसचे चाक धावत्या अवस्थेत निखळले होते. त्या बसमध्ये 28 प्रवासी होते. अवघ्या 15 दिवसांत पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने अहेरी आगारातील बसच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अहेरी आगाराला तातडीने नवीन बसेस द्याव्यात
अहेरी आगारातून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम व ग्रामीण भागात एसटी बससेवा चालविली जाते. अनेक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी ही सेवा जीवनवाहिनी ठरते. मात्र, जुन्या व जीर्ण बसेस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अहेरी आगारातील जुन्या व जीर्ण बसेस तातडीने टप्प्याटप्प्याने बंद करून त्याऐवजी नवीन, सुरक्षित व सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
अल्प कालावधीत बसचे चाक निखळण्याच्या दोन घटना घडूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नसेल, तर भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
बस रस्त्यावर सोडण्यापूर्वी तिची तांत्रिक तपासणी काटेकोरपणे केली जाते का? जुन्या बसेसची स्थिती तपासली जाते का? तसेच रस्त्यांची खराब अवस्था आणि वाहनांवरील वाढता ताण याबाबत संबंधित विभागांकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
नवीन बसेससोबत रस्त्यांचीही दुरुस्ती आवश्यक
अहेरी–कमलापूर मार्गासह गडचिरोली जिल्ह्यातील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी दर्जेदार रस्ते बांधकाम करावे. अहेरी आगाराला नवीन बसेस उपलब्ध करून देणे, बसची नियमित तांत्रिक तपासणी करणे आणि रस्ते सुधारणा करणे, या तीनही बाबींवर शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“आज प्रवाशांचा जीव वाचला, हे नशीब; पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असे नाही. जीवितहानी होण्याची वाट न पाहता अहेरी आगाराला तातडीने नवीन बसेस द्याव्यात,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


